मुंबई | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून मोठा वादंग निर्माण होत आहे. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वक्तव्यावरून सारवासारव करत म्हटले की, ‘मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही’.
खासदार सुळे यांनी ‘खोके’च्या आरोपावरून सत्तार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या विधानानंतर सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यात आता सत्तार यांनी म्हटले की, ”मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो होतो. सुप्रिया सुळे किंवा इतर कोणत्याही महिलेचे मन दुखेल असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु, मी असे काहीही बोललेलो नाही”.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याकडून सातत्याने काहीना काहीतरी वक्तव्य करून वाद ओढवून घेतला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना तशा सूचनाही दिल्या गेल्या होत्या. त्यानंतरही आज त्यांनी विधान केले आहे.