अॅडलेड | आयसीसी टी-20 वर्ल्ड कप येत्या गुरुवारी म्हणजेच 10 नोव्हेंबरला होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या मनगटाला दुखापत झाली आहे. अॅडलेडमध्ये रोहित शर्मा सराव करीत असताना त्याच्या मनगटाला ही दुखापत झाली आहे.
कर्णधार रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल अद्याप काही समजू शकले नाही. त्यामुळे त्याला सराव अर्ध्यावर सोडावा लागला. यावर अजूनतरी बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, गुरुवारीच उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. त्यामुळे जर रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर पडल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्याच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार रोहित शर्माने पाच सामन्यांत फलंदाजी करताना 89 धावा केल्या आहेत.