मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप, काँग्रेससह इतर अनेक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप नेत्यांनी गुजरातचा गड जिंकणे हे ध्येय ठरवले आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केले आहे. ”गुजरातमध्ये सध्या विरोधीपक्षच अस्तित्वात नाही. या निवडणुकीत भाजपचा 145 पेक्षा जास्त जागांवर विजय होणार आहे. यंदाही गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येईल”, असा विश्वास व्यक्त केला.
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील गुजरातचे असल्याने राज्य जिंकण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता बावनकुळे यांनी गुजरात निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ”मागील 27 वर्षांत गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. यावेळीदेखील आम्ही 145 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. तसे वातावरण गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये विरोधी पक्ष नाही”.
पक्षाच्या प्रचारासाठी कोणाला बोलवत नाही
जेव्हा-जेव्हा एखाद्या प्रदेशात निवडणूक लागते, तेव्हा आम्ही तेथे प्रचारासाठी जात असतो. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कोणीही कोणाला बोलवत नाही. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उठतो आणि प्रचाराला जातो. कोणालाही बोलवण्याची गरज भासत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.