नवी दिल्ली | आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर सीबीआयकडून केलेल्या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता कमी आहे. सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकरता अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज सुनावणी झाली नाही तर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख नवीन वर्षाचं स्वागत कुटुंबियांसोबत करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनिल देशमुखांना १२ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला सीबीआयने देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांच्या जामीनाला स्थगिती दिली होती. नाताळामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज बंद राहिले. सीबीआयने वारंवार हायकोर्टाकडे स्थगितीच्या मुदतवाढीसाठी मागणी केली. जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपत आहे. २७ डिसेंबरची स्थगितीची मुदत शेवटची असेल असंदेखील हायकोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे आज दिवसभरात सीबीआयने दिलेल्या आव्हानावर सुनावणी झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन तात्काळ लागू होऊ शकतो.
दरम्यान, १ नोव्हेंबर २०२१ ला ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुखांना जामीन मिळणं बाकी होतं. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला. परंतु त्याच दिवशी जामीनाला दहा दिवसांची स्थगिती देखील दिली.