फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत म्हणून प्रा. हरी नरके यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे… समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते…
९ ऑगस्ट क्रांती दिनी प्रा. हरी नरके यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंत असलेल्या क्रांतिकारकाचा मृत्यू व्हावा हा काय योगायोग आहे बघा… मुंबईत वयाच्या 60 व्या वर्षी हृदविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं… आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतला ऑक्सिजन निघून गेल्याची भावना त्याच्या जाण्यानंतर निर्माण झालीय… समता चळवळीचा आघाडीचा नेता आणि महाराष्ट्राचं एक ज्वलंत व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्याची भावना व्यक्त होत आहे…
मराठी भाषा आणि महाराष्ट्रावर कमालीचं प्रेम असलेल्यांपैकी प्रा. हरी नरके होते… मराठी भाषेला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासंबधी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
प्रा. हरी नरके यांच्या लेखनाचा आवाका देखील मोठा होता. विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख संबंधीत विषयांवर प्रकाश टाकणारे असायचे… ओबीसी आरक्षण, ओबीसी राजकारण, बहुजन, बहुजनांचं विभाजन… मराठा आरक्षण, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांच्या कार्याचा, विचारांचा गाढा अभ्यास असलेल्यांमध्ये प्रा. हरी नरके यांचं स्थान खूप वरचं होतं…
महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन….. महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा अशा पुस्तकांतून त्यांनी आपलं काम आणि विचार सर्वांपर्यंत पोहचवले. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा ग्रंथ प्रकाशित केला… त्याचे संपादक प्रा. हरी नरके होते. सोबतच डॉ आंबेडकरांच्या समग्र वाड्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले आहेत… त्यातील सहा खंडांचे संपादन प्रा. हरी नरके यांनी केले आहे.
ओबीसी चळवळ तसेच महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनाच्या चळवळीला त्यांनी वाहून घेतलं होतं… त्यांच्या अचानक जाण्यानं चळवळीचा मार्गदर्शक हरपला आहे… चळवळ पोरकी झाली आहे… हे मात्र निश्चित!