दिल्ली | सूर्यकुमार यादवने 18 जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत झालेल्या आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात सूर्या चमकला, त्याने नाबाद 31 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण मधल्या दोन वर्षांच्या काळात सूर्यकुमारने 24 एकदिवसीय सामन्यात 23.78 च्या सरसरीने फक्त 452 धावा केल्या आहेत. यात केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यामुळे स्काय वनडेत पावत नाय…. असे दिसते.
जेव्हा त्याला एकदिवसीय सामन्यांबद्दल विचारण्यात आले तेव्हा आपल्या खराब कामगिरीवर बोलताना सूर्या म्हणाला, “माझे एकदिवसीय आकडे खूप खराब आहेत, हे मान्य करायला मला लाज वाटत नाही. कारण प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. राहुल सर आणि रोहित यांनी मला अधिक सराव करून परिस्थितीनुसार खेळायला सांगितले असले, तरी आता त्यासाठी कामगिरी करणे आणि संघ मला देत असलेल्या संधींचा फायदा घेणे माझ्यावर अवलंबून आहे.”
अशा परिस्थितीत त्याच्या वनडे संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्याची वेळोवेळी पाठराखण करण्यात येत आहे. वर्ल्डकप येण्याअगोदर सूर्याचा फॉर्म यायला हवा अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करताना दिसत आहेत.