मुंबई | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना, आमचं सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी टीका झाली मात्र, विरोधकच आडवे पडले. तिकडं करप्शन फर्स्ट होत असून इकडं नेशन फर्स्ट होत आहे असं म्हटलं आहे.
त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र पुढे नेल्याने त्यांच्यामागे संपूर्ण महाराष्ट्र राहणार आहे. आम्ही अर्थसंकल्प मांडला, तरी तुमचा व्यर्थसंकल्प सुरूच होता. अर्थसंकल्प कसा वाचावा, समजून घ्यावा याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक लिहिलं आहे ते वाचा असा खोचक सल्ला देत विधिमंडळाचं कामकाज फेसबुक लाईव्ह करता येत नाही. काही जण आमदारकी वाचवण्यासाठी इथं येऊन फोटोसेशन करतात असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
आम्ही रस्ते धुतले, तुम्ही तिजोरी लुटली
मुख्यमंत्री शिंदे यांच्या डीप क्लीन मोहिमेवरून पाण्याचा अपव्यय होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेवरूनही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही रस्ते धुतले, तुम्ही तिजोरी लुटल्याचे ते म्हणाले. बारीक लक्ष देऊन काम करावं लागत, फेसबुक लाईव्ह करुन जमत नाही. अर्थसंकल्प अंतरिम असताना सर्व घटकांना न्याय दिला. काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी मध्येच सभागृहात हजेरी दाखवतात. सभागृहात ऑनलाईन उपस्थित राहता येत नाही, नाही तर घरातून उपस्थित झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला असलेला नेता दुपारी आपल्या सोबत राहील की नाही हे सांगता येत नाही देशाला मोदींची गॅरेंटी असल्याचे ते म्हणाले.