उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सहापैकी भाजपने पाचही जागांवर तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एका जागेवर उमेदवार जाहीर केले.महायुतीतल्या या सहा जागांपैकी रावेरमध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीला,धुळ्यातून सुभाष भामरे यांना तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध करण्यात आला आहे.. त्यामुळे उमेदवार घोषित करून भाजपचं काम सोपं होण्याऐवजी अडचणीचं झालंय. महायुततल्या या तिन्ही जागा डेंजर झोन मध्ये का आल्या आहेत. या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिडोंरी, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर अशा लोकसभेच्या सहा जागा आहेत. यापैकी नाशिक वगळता पाचही जागा भाजपकडे असून या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. नाशिकची जागा ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. भाजपने पाचपैकी जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलीये. तर रावेरमधून रक्षा खडसे, धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारमधून डॉ. हीना गावित, दिंडोरीतून डॉ. भारती पवार या विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. नाशिकमध्येही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंचीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे महायुतीच्या सहा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुतीच्या प्रचाराला जोर येईल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या सहापैकी तीन ठिकाणी उमेदवारांविरोधात थेट बंडाची भाषा केली जात आहे.
या तिन्ही ठिकाणचा तिढा सुटला नाही तर या जागा गमावण्याची भीती भाजपसमोर उभी ठाकली आहे.तर दिंडोरी, नंदुरबार आणि जळगाव या तीन लोकसभा मतदारसंघांत उघड बंडाचे वारे दिसत नसले तरी या ठिकाणी पक्षांतर्गत उमेदवाराविरोधात छुपी नाराजी आहे. नंदुरबारमध्ये हीना गावित यांच्या उमेदवारीला उघड विरोध होत नसला तरी कौटुंबिक वाद आणि भाजपच्या आमदारांची नाराजी आहे. जळगावमध्ये उन्मेश पाटील समर्थकांची नाराजी आहे, तर दिंडोरीतही डॉ. भारती पवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत छुपी नाराजी आहे. त्यामुळे या तीन जागा वरकरणी सुरक्षित दिसत असल्या तरी अंतर्गत धोका कायम असल्याचं चित्र आहे.त्यामुळे या नाराजीचा फटका उमेदवारांना निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्वतली जातेय.आणि या अंर्तगत विरोधाचा लाभ महाविकास आघाडीला होऊ शकतो.