मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे व ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील कळव्यात सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी अंधारे यांच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ लावला.या व्हिडीओत सुषमा अंधारे या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत होत्या. ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या बाई, ७०-८० वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिल्यावर हात लटलटणार असं म्हणणारी ही बाई तिला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून सांगता?”, असा घणाघात राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केला.ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यानंतर तुम्ही भुजबळांच्या मांडिला मांडी लावून बसता, तेव्हा माझ्या वडिलांना अटक करायला लावणाऱ्या माणसासोबत बसणार नाही असं वाटलं नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्र दिलं आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,
मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. “शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली की शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली ?फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल.27 वर्षांपूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल? असा प्रतीसवालही सुषमा अंधारे यांनी केला.पण असो माझ्या माऱ्यापुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना ? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे, याची पोचपावती तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून रहायला हवा.अशा शब्दांत अंधारे यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे.