एकेकाळी राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून अजित पवार आणि राज ठाकरे हे दोन पुतणे अनेकदा आमने-सामने आलेत. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्याआधीच राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार हे महायुतीत सामील झालेत. अशा परिस्थितीत एकेकाळी राजकारणातले कट्टर विरोधक असणारे दोन नेते एकाच विचारांनी पुढं जात असल्याचं जाणवलं. अशातच राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ 10 मे रोजी घेतलेल्या सभेत अजित पवारांचं कौतुक केलं. याचाच दाखला देत आता अजित पवारांनीही राज ठाकरेंच्या विधानाचा पुनरुच्चार केलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आपला मोर्चा राज्यातील इतर मतदारसंघात वळवला आहे. शनिवारी बीडमध्ये महायुतीच्या उेमदवार पंकजा मुडेंसाठी परळीत सभा घेतली. यावेळी सभेत बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकारेंच्या भाषणाचा संदर्भही दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी राजकीय भाष्य करत अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली. अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. राज ठाकरेंनी केलेल्या या विधानाचा पुनरुच्चार अजित पवारांनी बीडच्या सभेत केला. “पकंजा मुंडे ह्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षाचा आणि विकासाचा वारसा घेऊन लढत आहेत. गोपीनाथ मुंडेनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं. संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं. उपेक्षित, वंचित व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्यांनी राजकारण केल्याचं अजित पवार म्हणाले. त्यानंतर, कालच राज ठाकरेंनी सभेत जाहीरपणे सांगितले, एक गोष्ट मी मान्य करेन, अजित पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी कधी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊनच पुढे जाण्याची माझी भूमिका आहे. शिव-शाहू-फुले आंबेडकरांचे विचार घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो” असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या विधानाला दुजोरा दिला.
दरम्यान, बीडमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंनी आजच्या सांगता सभेत अजित पवार आणि उदयनराजे भोसले या दोन्ही दिग्गज मराठा नेत्यांना मैदानात उतरवलं. त्यामुळं आता बीड लोकसभेची निवडणूक चांगलीच चर्चेत आलीये.