राज्यात सध्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरूये. अशातंच पुणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत आहे. अशातंच मतदानाच्या आदल्या दिवशी अर्थात रविवार रात्रीपासूनच पुणे मतदारसंघात राडा पाहायला मिळत आहे. पैसेवाटपाचा आरोप करत उमेदवार धंगेकर यांनी चक्क पोलीस स्टेशन गाठले होते. तर, आज सकाळी मतदान केंद्रांवरही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच, आता चक्क काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावावरच बोगस मतदान झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मतदानाचा दिवस उलटला असला तरीही पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीये. भाजप पैसे वाटप करत आहेत, असं म्हणत काल रवींद्र धंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे.त्यानंतर आता पुणे काँग्रेस शहराध्यांच्याचा नावाने बोगस मतदान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सेंट मीरा स्कुलमध्ये बोगस मतदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावरील हे मतदान ते मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच झाल्याचं उघडकीस आलंय. या घटनेनंतर अरविंद शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून ऑनलाईन तक्रारही केली आहे.
अरविंद शिंदे काय म्हणाले?
”मी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलो, पण माझ्या नावावर रेड लाईन मारली होती, मला सांगितलं की तुमचं मतदान झालंय. माझ्या नावापुढे दुसऱ्याचाच शिक्का आणि सहीही वेगळीच असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे येथील आधारकार्डचा नंबरही माझा नव्हता. यावेळी पोलिंग एजंटने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, तर तिथेही दमबाजी करण्यात आली”, असं काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, या घटनेनंतर बॅलेट पेपरवर चॅलेंज करुन मी टेंडर व्होट करुन आलोय. मी ऑनलाईन तक्रारही केली आहे, असे अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. त्यामुळं मतदानाच्या आदल्या दिवशी पुण्यात सुरू झालेला राडा अजूनही थांबताना दिसत नाहीये. त्यामुळं पुण्यातील या लडतीकडे सध्या राज्याचं लक्ष वेधलं गेलंय.