अहमदनगर | देशभरात निवडणूकीचं वातावरण आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही आज चौथ्या टप्प्यामधील मतदान सुरु असून यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आणि मतदानाच्या दिवशीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर केला. तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गावागावात पाकीट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला.
आता विखेंनी लंके आणि रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर देत, पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेर मधील जनताच उध्वस्त करणार आहे अशी प्रतिक्रिया विखे यांनी दिली आहे. याशिवाय पवार यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले की, 2019 मध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा टोला सुजय विखे यांनी पवारांना लगावला आहे. आपण काय केलं ते पाहावं आणि नंतर दुसऱ्यावर टीका टिप्पणी करावी, असेही सुजय विखेंनी म्हटलं आहे.
पारनेरमधील भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तेव्हा शिंदे गाडीच्या बाजूला उभा आहेत असा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय…त्यामुळे राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत बोलताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी म्हटले की, पारनेर मधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे.