धुळे | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंना सवाल उपस्थित केले आहेत.
काँग्रेस सनातन धर्माला विरोध करते, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध करते उद्धव ठाकरे तुम्हाला हे मान्य आहे का? ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का आले नाहीत? ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं की, सनातन धर्माच्या विरोधात आपण आहात का? हे प्रश्न उपस्थित करत शाह यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
तसेच या निवडणुकीत एकीकडे 12 हजार कोटींचे घोटाळे करणारे आणि दुसरीकडे 23-23 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तर दुसरीकडे चहा विकणारे नरेंद्र मोदी आहेत. राम मंदिराच्या मुद्द्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी 70-70 वर्ष अडकवलं ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारल असल्याचं सभेत बोलताना शहा यांनी सांगितलं आहे.
याव्यतिरिक्त अमित शहा यांनी मोदींच्या कार्यकाळात झालेल्या कामांबाबत सांगताना, कलम ३७० हटवणे, काशी विश्वनाथ मंदिर या मुद्द्यांसह काँग्रेसने अर्थव्यवस्थेला 11 व्या क्रमांकावर नेले मात्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर देशातली तिसरी अर्थव्यवस्था बनवू असं म्हणत मोदींना पंतप्रधान करायचं आहे की नाही? डॉ. सुभाष भामरे यांना खासदार करायचं आहे की नाही असा सवाल धुळेकरांना विचारला आहे.