राज्यातील चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. परंतु सुजय विखे-पाटील, संदीपान भुमरे आणि वसंत मोरेंना या तीन उमेदवारांना मतदान करता आले नाही.
त्याचं कारण म्हणजे ते जिथून उभा आहेत त्या मतदारसंघातल्या मतदारयादीत त्यांची नोंद नसल्यानं हे उमेदवार स्वतःलाच मत देऊ शकले नाहीत. अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आणि पुण्यातून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण या तीन उमेदवारांना स्वतःला मतदान करता आले नाही. ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत, तिथल्या मतदार यादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आलीय. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा समावेश आहे. संदीपान भुमरेंचं मतदान जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये आहे, सुजय विखेंचं नाव शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमधल्या मतदारयादीमध्ये आहे तर वसंत मोरे यांचं नाव कात्रजमधल्या मतदारयादीत असून हा भाग शिरुर मतदारसंघाला जोडलेला आहे. त्यामुळे हे उमेदवार स्वतःलाच मतदान करण्यापासून दूर राहिले आहेत.