भिवंडी | लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. महाराष्ट्रात मात्र आजचा हा शेवटचा टप्पा आहे. भिवंडी, नाशिक, मुंबई यासह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरु आहे. यापैकी भिवंडीची लढत पाहिली तर इथं सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामा यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे. तर भाजपाने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली आहे.या तिहेरी लढतीचं गणित कसं आहे. कपिल पाटलांची हॅट्रीक होणार की, मतदारराजा भाकरी फिरवणार?हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ…
मुंबई उपनगरांमधील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडं पाहिलं जातं.२००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला..सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर कॉंग्रेसचं वर्चस्व होतं. पण २०१४ च्या मोदी लाटेत भाजपनं इथं ही करिष्मा दाखवत आपला उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलं. भिवंडी लोकसभेत भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.. यापैकी दोन ठिकाणी भाजपचे, दोन ठिकाणी शिंदेसेनेचे , एका जागेवर समाजवादी पक्षाचा आणि उरलेल्या एका जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आमदार आहे.
भिवंडी लोकसभेतील समस्या बघितल्या तर कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, शहापूर-मुरबाडमधील पाणी प्रश्न, भिवंडीतील डबघाईला आलेला यंत्रमाग उद्योग, टोरेंट पॉवर विजेचा प्रश्न, एकही वीट न लागलेली मेट्रो आणि कल्याण-मुरबाड रेल्वे या बरोबरच मतदारसंघातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, घाणीचं साम्राज्य या समस्या ‘जैसे थे’ आहेत. या मुद्द्यांबाबत कपिल पाटील यांना मतदारांनी प्रश्न विचारून निरुत्तर केल्याचं पहायला मिळालं. शिवाय मोदींनी केलेल्या कामाशिवाय कपिल पाटील हे आपल्या प्रचारात स्वत:चं असं वेगळं काहीच सांगू शकले नाहीत. हा मुद्दा जनतेतून सर्वत्र चर्चिला जात असल्यानं मतदार राजा आपल्या मतांचं बोट त्यांच्याकडे कितपत वळवतील हे पाहणं महत्वाचं असेल..तर सुरेश म्हात्रे यांच्या पक्षनिष्ठा आणि स्थिरता या दोन्ही गोष्टींबाबत इथल्या जनतेच्या मनात आजही संभ्रमच असल्यानं हा संभ्रम त्यांच्या मतपेटीवर परिणाम करण्याची शक्यता आहे. याच बाबीचा नेमका फायदा निलेश सांबरे यांना होईल, असं बोललं जातं…त्यामुळं भिवंडीत भाकरी फिरणार का हे ४ जूनला स्पष्ट होईल.