देशात लोकसभा निवडणूकीची वाटचाल पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्याकडे चाललीय…आता येणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मेला, सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मेला तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. त्यातच देशात सर्वाधिक जागा असलेल्या उत्तरप्रदेश या राज्यात अजून 41 लोकसभा मतदार संघांचं मतदान होण बाकी आहे…उत्तरप्रदेशचं राजकीय वातावरण सत्ताधारी भाजपने पहिल्या चार टप्प्यात ढवळून काढलं.उत्तर प्रदेश भाजपसाठी का महत्वाचा आहे.? भाजपची नेमकी रणनीती काय असणार आहे? याच संदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेऊ…
देशात लोकसभा मतदारसंघाच्या सर्वाधिक जागा उत्तरप्रदेश या राज्यात आहे त्यामुळे उत्तरप्रदेशात ज्या पक्षाचे जास्त खासदार त्यांची दिल्लीत सत्ता असं राजकीय गणित जुळवलं जातं.त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा असते.आता जी देशात भाजपची सत्ता आहे ती उत्तरप्रदेशातील राजकीय दबदब्यामुळेच आहे असंही बोललं जातं.उत्तरप्रदेशात सत्ताधारी भाजपचे नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजकीय दबदबा असला तरी विरोधक म्हणून सपा म्हणजेच समाजवादी पक्ष आणि बसपा म्हणजे बहुजन समाज पक्षाचं वर्चस्व देखील नाकारता येत नाही..गेल्या काही महिन्यांपूर्वी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.आणि हाच मुद्दा या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठेचा केलाय.
पहिल्या चार टप्प्यातील मतदानात भाजपने श्रीराम मंदिराचा मुद्दा प्रचार सभेत गाजवला होता त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपने धार्मिक मुद्यावर निवडणूक नेल्याचं दिसून आलं.विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील राजकारणात दबदबा असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती या सत्ताधारी भाजपच्या रडारवर नसल्याचं चित्र आहे.कारण 2019 च्या लोकसभा आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मायावतींवर हल्ला चढवला होता.त्याच्या तुलनेत यंदा भाजपने मायावतींबाबत मौन बाळगलय.उत्तरप्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत.ते मायावतींवर टीका करण्याचं टाळत आहेत.केवळ भूपेंद्र चौधरीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह स्टार प्रचारकांनी घेतलेल्या प्रचार सभांमध्ये मायावतींबाबत कोणीही बोलताना दिसलं नाही.
तर दुसरीकडे मायावतींकडून देखील भाजपवर थेट हल्ले होताना दिसत नाही. महागाई, बेरोजगारी, धार्मिक तेढ आदी मुद्यांवर जेवढ्यास-तेवढं त्या बोलताना दिसतात त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे…इथल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे अखिलेश यादव यांना सर्वाधिक लक्ष्य केलं आहे.भाजपकडून या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे.पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणे वेळी निमंत्रण देऊन देखील उपस्थित न राहिल्यामुळे टीका करताना दिसत आहेत.या तुलनेत भाजपने मायावतींबाबत सौम्य भूमिका घेतल्याचं दिसून येतं.