लोकसभा निवडणूकीचा निकाल येण्यापूर्वीच महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पराभव झाला तर त्याला भाजप नेते चंद्रकांत पाटील जबाबदार असतील असं म्हटलं होतं. आता शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडलंय. त्यावर अजित पवार यांच्या आमदारांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही. मी याची लिस्ट अजित पवारांना दिली होती. निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही पण सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झालं असतं. 100 टक्के कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर प्रतिस्पर्धी असलेले संजोग वाघेरेंचे डिपॉझीट जप्त झाले असते असे वक्तव्य श्रीरंग बारणे यांनी केलं होतं.
श्रीरंग बारणेंच्या आरोपांना उत्तर देताना, मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. तसे आदेश आम्हाला आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिले होते. आम्ही काम देखील केलं आहे. पार्थ पवार स्वतः याठिकाणी थांबले होते आणि आम्ही प्रचार केला आहे. बारणे यांच्याकडून खापर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या विषयी मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांनी आता मान्य केलं पाहिजे असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.