महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला असून या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 97.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. यंदा 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
दरवेळेप्रमाणे यावर्षीही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर ठरल्या आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या तनिषा बोरामणीकर या विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील 8,782 मुलांना 90 टक्के गुण मिळाले आहेत अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. 100 टक्के गुण मिळवणारी विद्यार्थिनी तनिषा बोरामणीकर हिच्या विषयी आणखी सांगायचं झालं तर ती नॅशनल गेम खेळलेली बुध्दीबळ पट्टू आहे.
तनिषा ही छत्रपती संभाजी नगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला पाली, अर्थशास्त्र आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयात शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी विषयात 89 गुण, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात 95 गुण तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण मिळाले आहेत. तनिषा ही बुध्दीबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. तनिषाने ज्याप्रमाणे बुद्धीबळाच्या खेळात नावलौकिक मिळवलं त्याप्रमाणे बारावीच्या परीक्षेतही तिने विशेष कामगिरी केली आहे.
दरम्यान, बारावी परीक्षेचा निकाल ज्या बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. mahresult.nic.in ही वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली होती. विद्यार्थी आणि पालक मात्र ही वेबसाईट बंद असलेली पाहून संतापलेले पाहायला मिळाले. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली.