देशातील लोकसभा निवडणूक आता संपली आहे. आता सर्वाना प्रतीक्षा आहे ती चार जूनच्या निकालाची. कारण ४ जून रोजीच निकालाचे खरे चित्र स्पष्ट होईल. पण त्याआधी अनेक राजकीय नेते विजयाचे दावे करताना दिसत आहेत.तसेच विविध वृत्तसंस्थांचे एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. आता राज्यातील एक्झिट पोलबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोठा दावा केला आहे.
भुजबळांनी एक्झिट पोलवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. यावर ‘महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, तर चुकून दोन-चार जागा महाविकास आघाडीला जातील’, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. एकंदरीतच निवडणुकीतील भुजबळांची नाराजी, जितेंद्र आव्हाडांची पाठराखण आणि निवडणूक एक्झिट पोलवर केलेला दावा, यामुळे छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत. आता भुजबळांनी केलेला दावा कितपत खरा ठरणार का? हे येत्या ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.
अलीकडे वेगवेगळ्या कारणांनी छगन भुजबळ चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली होती. यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला. मुश्रीफ यांच्या नाराजीनंतर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ‘ते वरिष्ठ आहेत. त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही जितेंद्र आव्हाडांना विरोध करा परंतु बाबासाहेबांना, बहुजनांना नको असलेली मनुस्मृतीचा आधी विरोध करा. ती शालेय शिक्षणात येता कामा नये. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. अर्थात ते असलंच पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांना काय शिक्षा द्यायची ती द्या. पण, दुसरीकडे मनुस्मृतीला देखील विरोध करा, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.