लोकसभेची निवडणूक देशाबरोबरच महाराष्ट्रातही अत्यंत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपसाठी देखील ही निवडणूक आव्हानातम्क होती. काँग्रेसच्या ही अस्तित्वाची लढाई होती. आता या निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे.राज्यातल्या ४८ लोकसभा मतदारसंघात कोण विजयी झालंय ? कोण पराभूत झालं आहे.कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत ? याचा संपूर्ण निकाल आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत…
या संपूर्ण निकालातून राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसला आहे.कारण महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे.तर महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. यात काँग्रेस हा राज्यातील एक नंबरचा पक्ष बनला आहे.काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत.तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंची शिवसेना असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे.तर महायुतीला मिळालेल्या १७ जागांपैकी भाजपला केवळ ९ मिळवता आल्या आहेत.गेल्या वेळी भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या.त्या तुलनेत यावेळी भाजपचं १४ जागांचं नुकसान झालंय.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत.त्यांनी १५ जागा लढवल्या होत्या.तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांना फक्त १ जागा राखता आलीये.शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत शरद पवार यांचं च पारडं जड राहिलं आहे तर शिंदे विरुद्ध ठाकरे लढाईत उद्धव ठाकरे यांनाच जनतेचा कौल अधिक असल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे.