उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले.वायकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव केला. पण आता वायकरांचा विजय हा मॅनेज केला असल्याचा आरोप केला जातोय ? या मतदारसंघात नेमकं काय घडलं ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ..
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या. टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल किर्तीकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली होती. तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचं सांगण्यात आलं.मात्र पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले. रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ठाकरेंची शिवसेना मात्र आक्रमक झाली. या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला.अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.उत्तर पश्चिम मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
या मतदारसंघातील मतमोजणी जितकी रंगतदार ठरली तितकच इथलं राजकारण सुद्धा चर्चेत होतं.अमोल कीर्तिकर यांचे वडील गजाजन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार तर होतेच पण त्यांनी शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केलं होतं.युवा सेनेत सक्रिय असलेले अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कायम राहिले. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी अमोल कीर्तिकरांचे वडील जरी शिंदेंच्या शिवसेनेत असले तरी त्यांना उमेदवारी दिली.उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही गजानन कीर्तिकर यांनी आपली भूमिका कायम ठेवत शिंदेंसोबतच राहिले.यामुळे या लढतीत वडील हे आपल्या मुलाच्या विरोधी उमेदवाराच्या पक्षात होते.दुसरीकडे रविंद्र वायकर ज्यांनी 48 मतांनी विजय मिळवला त्यांचं नावही बरंच चर्चेत राहिलं. याचं कारण म्हणजे त्यांनी निवडणुकीच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच शिंदेसेनेत प्रवेश केला.रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथे भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांच्यावर इडीची चौकशी सुद्धा सुरू आहे. या चौकशी दरम्यानच वायकर यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.वायकर यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य सुद्धा निवडणुकीपूर्वी चर्चेत राहिलं. वायकर म्हणाले होते, तुरूंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते.या वक्तव्यानंतर रविंद्र वायकर यांना स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं होतं.
आता रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती. त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला,असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात पार पडली. मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असताना रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंदरकर आणि मुलगी दीप्ती यांच्याकडून मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याचं शहा आणि आरोरा यांच्या लक्षात आलं.त्यांनी या दोघांनाही मोबाईल वापरण्यापासून रोखलं. तसेच ही बाब आरओ वंदना सूर्यवंशी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. मात्र, त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितल्यानंतर शहा आणि अरोरा या दोघांनी वाईकर यांच्या मेव्हण्याला वनराई पोलीस ठाण्यात घेऊन गेले.मात्र, त्या ठिकाणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल न करता फक्त तक्रार दाखल करून घेतली. याबाबत अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अहवाल पोलिसांकडे पाठवला नाही, असा आरोप तक्रारदार शहा आणि अरोरा यांनी केला. निवडणुकीत अमोल कीर्तीकर यांचाच विजय झाला होता. पण हा विजय शिंदे गटाने ढापला, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.पोलीस कारवाई करत नसून पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचं भरत शहा यांनी म्हटलंय. रवींद्र वायकर यांची शपथ होण्याआधी यासंदर्भात कारवाई व्हावी अशीही मागणी त्यांनी केलीय.तसेच या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. वायकर यांची कारकीर्द पाहिल्यास त्यांची राजकारणात सुरुवात नगरसेवक पदापासून सुरु झाली. 1992 मध्ये प्रथम ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2006-2010 या काळात त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. 2009, 2014 आणि 2019 सलग तीन टर्म जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले.2014 साली शिवसेना भाजपा सरकार आले तेव्हा त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळालं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे.पण आता या निवडणुकीत झालेल्या उलटफेरच्या आरोपामुळे त्यांच्या समोरच्या अडचणी वाढू शक्तात.