लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात 2019 च्या तुलनेत चांगलं यश मिळालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी चांगलं यश मिळवलं आणि या दोघांच्या साथीनं काँग्रेसनंही अनपेक्षित यश प्राप्त केलं.आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि महाविकास आघाडीने त्यासंबंधी हालाचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीला चार महिन्यांचा अवधी आहे. निवडणुकीची जय्यत तयारी करता यावी आणि जागावाटपावेळी होणारा वाद टाळता यावा यासाठी महाविकास आघाडीने जागावाटप लवकर पूर्ण करण्याचं ठरवलंय. महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चाही झाल्याची माहिती समोर आली आहे.लवकरच याबद्दल अधिकृतपणे भूमिका मांडली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किती जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार? नेमका हा संभाव्य फॉर्म्युला काय आहे? हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ..
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर मविआचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील, याबाबत साशंकता होती. मात्र, मविआने 30 जागा जिंकत या सर्व शंका-कुशंका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची १५ जून रोजी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेआधी तीन प्रमुख पक्षांची जागावाटपासाठी प्राथमिक बैठक झाली. सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे.महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या, त्यातील 13 उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसकडून अधिक जागांचा दावा केला जाऊ शकतो…काँग्रेसची ताकद विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातला काही भाग आणि मुंबईतल्या काही भागात आहे. तिथं त्यांना जास्त जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस सर्वाधिक 100 ते 105 जागांवर निवडणूक लढू शकते.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आहे. विदर्भात पक्ष किती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू शकतो, किंवा किती जागा जिंकू शकतो, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघातील 30 पैकी 14 विधानसभा क्षेत्रांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केल्याने उद्धव ठाकरे यांचा मिशन विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारा देखील ठरू शकतो…लोकसभा निवडणुकीत मविआमध्ये सांगलीच्या जागेवरून बरीच खडाजंगी झाली. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि मविआचा अधिकृत उमेदवार ठाकरेच्या सेनेचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील काही जागांवरून खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळू शकतील. जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 80 ते 85 जागा मिळू शकतात. लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या चुका विधानसभेला होऊ नये यासाठी विशेष काळजी महाविकास आघाडीकडून घेतली जाणार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीनं केलेला दिसतोय.