विधानपरिषद निवडणूक २०२४
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने 12 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ पाहता एक उमेदवार पडणार हे निश्चित मानलं जात आहे. क्रॉस व्होटिंगची शंका असल्यानं सर्वच पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित नेमकं काय आहे ? क्रॉस व्होटिंगची भीती कोणत्या पक्षाला आहे ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित जाणून घेण्याआधी आपण महाराष्ट्र विधान परिषदेची रचना समजून घेऊयात.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (1) मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे. केंद्रात ज्याप्रकारे राज्यसभा हे वरीष्ठ सभागृह असतं त्याप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरीष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. पण वरीष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात. विधान परिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही. तर सभागृहातील एकूण सदस्यसंख्येपैकी एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात. राज्यात विधानसभेत 288 सदस्य आहेत. तर विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे.संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यांतील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान 40 असावी. तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश इतकी असू शकते. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 96 पर्यंत वाढवता येऊ शकते. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदार संघ, 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून आणि 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठीची पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 30 जागांपैकी 11 जागांवर होत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुतीनं 9 उमेदवार दिलेत. तर महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिलेत. भाजपनं पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोतांना उमेदवारी दिली. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंनी अर्ज दाखल केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीनंही तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय.