येत्या १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार असून एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. विधानपरिषदेचे उमेदवारी अर्ज परत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अपक्ष उमदेवार जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एकजण माघार घेईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु उमेदवारी अर्ज परत मागे घेण्याची वेळ संपूनही कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने आता येत्या १२ तारखेला विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत.विधान परिषदेसाठी येत्या १२ जुलैला विधिमंडळात गुप्त पद्धतीने मतदान पार पडेल. मतदान गुप्तपणे पार पडत असल्याने यामध्ये मतफुटी होण्याचा जास्त धोका आहे. त्याचप्रमाणे पैशांचा वापर होण्याची देखील शक्यता आहे. यासगळ्यामधे १२ जुलैला कोणाची मत फुटणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
प्रत्येक पक्षाने निवडणुकीसाठी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने आपले पाच उमेदवार रिंगणात उतरवले असून यामध्ये पंकजा मुंडे,योगेश टिळेकर,सदाभाऊ खोत,अमित गोरखे आणि परिणय फुके यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील निवडणूक लढवणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध अत्यंत चांगले असल्याने या निवडणुकीत ते कामाला येणार का? हे पाहावे लागेल. तसे झाल्यास मिलिंद नार्वेकर सत्ताधारी महायुतीमधील कोणत्या पक्षाची मतं फोडणार हे आपल्याला पाहावं लागेल.