काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी सातत्याने समोर येत आहे. आताही तसाच प्रकार समोर आला आहे. काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सध्या अनेक आमदारांमध्ये खदखद असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. शपथ घेऊनही त्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप केले. तसेच नाना पटोले यांनी मतदारसंघात काय चाललंय, याबद्दल कधीच विचारलं नाही”, असा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे.
“तिकीट द्यायचं नसेल तर देऊ नका. पण बदनाम करु नका. मी याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. तसेच पक्ष श्रेष्ठी हे माझी बदनामी करत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार अध्यक्षांवर नाराज असून त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे”, असंही हिरामण खोसकर यांनी म्हटलं.“विधान परिषद निवडणुकीत मी महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. याबद्दल मी शपथ घेऊन सांगितलं, तरी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ज्यांचे मत फुटले, त्या 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप करण्यात आला. मला उमेदवारी द्यायची नसेल तर नका देऊ, पण बदनाम करू नका. पक्षश्रेष्ठींकडून माझी बदनामी होत आहे आणि हे चांगलं नाही”, असंही हिरामण खोसकर म्हणाले.नाना पटोले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. मी त्यांची नावं सांगणार नाही. पण अनेक आमदारांनी नाना पटोलेंबाबत वरिष्ठ नेत्यांना तक्रार केली आहे, असा खुलासाही हिरामण खोसकर यांनी केला.