आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. विधानसभा निवडणुकीला केवळ दीड ते दोन महिने राहिले असून राजकीय पक्षांकडून जागावाटप तसेच कोणाला उमेदवारी द्यावी यासंदर्भात चर्चा होत आहेत. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसताना अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपल्या पक्षातील उमेदवारांच्या नावाच्या घोषणा देखील केल्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात दौरे करत असतानाच त्यांनी ३ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. १९ जुलैला शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केलीये. जनतेला अमित भांगरे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन देखील केले आहे.
याआधी शरद पवार सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासोबतच करमाळा येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती.शेतकरी सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी “अमित भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संधी द्या” सांगितले. तुमच्या पाठिंब्याशिवाय अकोलेत परिवर्तन होणार नाही. पाच वर्षांपूर्वी मी एका डॉक्टरला म्हणजेच आमदार किरण लहामटे यांना संधी दिली होती. मला वाटलं होतं की तो साधा माणूस आहे, त्याला शब्दांची दाद मिळेल. काहीही झालं तरी पवार साहेबांना सोडणार नाही असं भाषण त्यांनी दिलं होतं, पण मुंबईत गेल्यावर त्यांनी आपला विचार बदलला. विधानसभा निवडणूक कोठे लढवायची हेच माहीत नसलेल्याला बसवण्याची वेळ आली आहे. असं ते यावेळी म्हंटले तसेच तरुणांच्या ताकदीशिवाय अकोले आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलणार नाही.” असेही ते म्हणाले.