मी राजकारण करत नाही. पण कोणी माझ्या नादी लागलं तर मी सोडत पण नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच फडणवीस यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर दिलं..फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की, कशाप्रकारे गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, त्यांना मोक्का लागावा यासाठी वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. गुन्हे दाखल करायला लावले. या संदर्भातील पुरावे मी दिले होते. त्यानंतरच सीबीआयने केस दाखल केली. सीबीआयने कोर्टात चार्जशिट दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून कशाप्रकारे विरोधी पक्षातील आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेस लावणे हे प्रकार सुरु होते. हे आपण पाहिले आहे.’
‘श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात. त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. मला असं वाटतं इको सिस्टममध्ये आता सुपारीबाज लोकं घुसले आहे. सुपारी घेऊन बोलणारे लोकं घुसले आहेत.दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का? एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करतायत मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.’‘मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिजवल मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे, वाझेवर काय बोलताय ते सगळं माझ्याकडे आहे. माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करेल. रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे मी पुराव्य़ा शिवाय काहीही बोलत नाही.’ त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या विधानांतून नेमका कोणावर निशाणा साधला आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तसेच या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.