पुणे । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जण लढण्यास इच्छुक आहेत. अशात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आपले वडील १०० टक्के निवडणूक लढणार असल्याचं विधान केलं आहे. ‘काहीही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, पण ती कशी लढायची यावर आताच काही बोलणार नाही’ असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत. आमच्यावर आतापर्यंत तीन वेळा अन्याय झाला, पण यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या इंदापूर विधानसभेचे नेतृत्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे करत असून त्यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. यावेळच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे महायुतीतून उत्सुक आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अंकिता पाटील म्हणाल्या की, इंदापूरचा कार्यकर्ता आमचा श्वास आहे. अद्यापपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही. तीन वेळा आमच्यावर अन्याय झाला. जागा वाटपाचा निर्णयात आतापर्यंत झालं नाही. जागावटपात काय होतंय हे महत्त्वाचं आहे. इंदापूर तालुका 2014 पर्यंत प्रगतीपथावरचा तालुका होता, आता तालुका वीस वर्षे मागे गेला आहे. या ठिकाणच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला, कोणतीही डेव्हलपमेंट झाली नाही. गुन्हेगारी वाढली आहे. हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणार हे 100 टक्के निश्चित. ते कसे लढतील यावर बोलणार नाही, पण आम्ही विधानसभा निवडणूक लढणार असं त्या म्हणाल्या. दरम्यान निवडणूक लढण्यासंदर्भांत हर्षवर्धन पाटील एका वृत्तवाहिनीशी संवाद म्हणाले की, महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे, पण इंदापूरच्या जागेसंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. कोणती जागा कुणाला जाणार यावर आमचे वरिष्ठ चर्चा करतील. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकशाही आहे त्यांचा तो अधिकार आहे. लोकसभेआधी आमचं असं ठरलं होतं की जो देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील तो फायनल असेल. अजून याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्या कार्यकर्त्यांवरती दहा वर्ष झालं अन्याय झाला आहे, त्रास झाला आहे. इंदापूर तालुका हा राजकीय वजन असलेला तालुका आहे. इथला मतदार हुशार आहे. इथं लोकभावना स्पष्ट व्यक्त करतात, कुणावरही कोणताही दबाव नाही. कार्यकर्त्यांना मी अपक्ष लढावं असं का वाटतं हे याचं अजून मी परीक्षण केलं नाही, पण त्यांची भूमिका समजावून घेईन. या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूरातील वातावरण मात्र तापायला सुरुवात झाली आहे.