100 कोटींच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप केला. तसेच या प्रकरणातील पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिले आहे. फडणवीसांना लिहलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव असल्याचा दावा केला आहे. वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच मुंबईचे निलंबीत पोलीस अधिकारी आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. वसुली प्रकरणात सचिन वाझेंनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी नेमके काय आरोप केले आहेत ते जाणून घेऊयात. सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. पण त्या पत्रात नेमकं काय लिहिलं आहे. याची माहिती अजून तरी समोर आली नाही. परंतु सचिन वाझे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या पत्रातच त्यांनी अनिल देशमुखांबरोबरच जयंत पाटलांवर देखील आरोप केले आहेत. पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमके काय आरोप केले यासंदर्भातील माहिती समोर येईल. सचिन वाझे यांनी मोठा गौप्यस्फोट करत म्हटलं की, फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटलांचेही नाव लिहलंय. अनिल देशमुखांना पी ए मार्फत पैसे दिले जायचे. मी जे बोलतोय, त्याचे सारे पुरावे आहेत,सीबीआयकडेही पुरावे आहेत. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात मी सारे पुरावे दिले आहेत. माझी नार्को करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे असे खळबळजनक दावे सचिन वाझे यांनी केले आहेत. आता यावर जयंत पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.