विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर मधून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. एमआयएम पक्षातून इम्तियाज जलील आणि डॉ. गफ्फार कादरी असे दोनच नेते विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. इम्तियाज जलील यांनी २०२४ लोकसभा निवडणुक लढवली होती. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांनी इम्तियाज जलील यांचा १,३४,६५० मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा १९,९८२ मतांनी पराभव केला होता.
इम्तियाज जलील यांनी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीने आम्हाला त्यांच्यासोबत सहभागी करून घेतलं तर जागावाटपामध्ये आम्ही जास्त जागांसाठी मागणी करणार नाही. असा प्रस्ताव त्यांनी महाविकास आघाडी समोर ठेवला आहे. आमची विधानसभा निवडणुकीसाठी ३० जागांवर चाचपणी सुरु असून नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगरमधील दोन मतदारसंघ, धुळे, मालेगाव, भिवंडी या जागांवर चर्चा सुरू आहे. आमच्या पक्षाची ताकद असणाऱ्या मतदारसंघात उमेदवार उतरविण्यासाठी संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. या संदर्भातील बैठक लवकरच मुंबईत घेतली जाणार असल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.