देशात लोकसभेच्या निवडणूका झाल्यानंतर राज्यसभेचे काही सदस्य लोकसभेत निवडून गेल्याने राज्यसभेच्या १२ जागा रिक्त झाल्या. त्यामुळे या १२ जागांसाठी आता ३ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात ही राज्यसभेसाठीच्या २ जागा रिक्त झाल्या असून, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि उत्तर मुंबईमधून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे २ जागा रिक्त झाल्या. आता या दोन्ही जागा भाजपच्या असल्याने भाजपकडून कोणाला तिकीट दिलं जाणार? अगोदर म्हटल्याप्रमाणं भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक जागा दिली जाणार का? मग एका जागेवर भाजपाकडून कोणाला संधी दिली जाणार? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचं गणित करायचं झाल्यास भाजपा राज्यसभेवर कोणाला पाठवणार? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमांतून पाहणार आहोत.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रातून राज्यसभेचे २ खासदार आता लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या दोन जागा रिक्त झाल्यात. या दोन्ही जागा भाजपाच्या आहेत. परंतु, यातील एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सातारा दौऱ्यावर असताना स्पष्ट केलं होतं. त्यामुळं भाजपाकडं एकच जागा असणार आहे. आता एकच जागा असल्यानं त्यावर कोणाला पाठवायचं असा पेच महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वासमोर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलीय. आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच फटका बसला. त्यामुळं विधानसभेला कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी नेतृत्वाकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. आता राज्यसभेवर पाठवण्यासाठी अनेक नावं समोर आहेत परंतु, त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती जालना लोकसभा मतदार संघातून पराभूत झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाची. भाजपमधून या जागेसाठी राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो. खरं तर, उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळं रिक्त झालेली राज्यसभेची ही जागा संजय काकडेंचीच होती. भारतीय जनता पार्टीसाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या संजय काकडे यांच्यासारख्या नेत्याची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला मोठी गरज आहे. त्यामुळं आता भाजपाचं नेतृत्व काय विचार करतं आणि कोणाला संधी देतं हे लवकरच दिसेल. राज्यसभेची दुसरी जागा ठरल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीनं घेतला तर, दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे. अल्पसंख्याक समाजातील व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे बाबा सिद्धीकी यांची राज्यसभेसाठी वर्णी लागण्याची जास्त शक्यता आहे. तसेच, दुसरं चर्चेत नाव आहे ते म्हणजे साताऱ्याचे नितीन पाटील यांचं.