नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या खासदारकीलाच थेट आव्हान केल आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी मतदारांना धमकी देऊन मतं मिळवली असा आरोप शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स बजावलं आहे.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये भाजपच्या नारायण राणे आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनायक राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला होता. परंतु निवडणुकीत नारायण राणे यांनी मतदारांना धमकवून, बळजबरी करून मतं मिळवत विजयी झाले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ५ मे २०२४ रोजी संपला होता. पण भाजप कार्यकर्ते ६ मे ला देखील नारायण राणे यांचा प्रचार करत होते. प्रचारादरम्यान मतदारांना पैसे वाटले. नारायण राणे यांचे पुत्र व आमदार नितेश राणे यांनी सभेमध्ये तुम्ही नारायण राणे यांना मत दिले नाही तर आमच्याकडे निधी मागायला येऊ नका असं त्यांनी मतदारांना यावेळी धमकावलं. असा आरोप विनायक राऊत यांनी करत हायकोर्टात याचिका दाखल करत नारायण राणे यांचा विजय रद्द करून निवडणूक काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत या संदर्भातील मागणी त्यांनी याचिकेत केली होती. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स बजावलं आहे.