विधानसभा निवडणुक जस-जशी जवळ येईल त्याप्रमाणे राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राजकीय पक्षांची राज्यात मोर्चे बांधणी सुरु आहे. तर विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठी अनेकजण आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्याचप्रमाणं राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत.आज लातूरमध्ये व्ही एस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते शरद पवारांसारखे भागुबाई नव्हते, येणारे काही महिने हा वादळी काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यातून शासनाचा भ्रष्टाचार समोर आला आहे.सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राजकारणाचा आधारस्तंभ हा विकास नाहीतर दंगल घडविणे आहे. पण जे पेरलं तेच उगवतं. आता राजकारणातून हेच पेरलं जात आहे.
त्याचबरोबर, परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि सरकारचे यावर नियंत्रण नाही. सर्व नेते हे पळपुटे आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर पवार स्पष्ट भूमिका मांडत नाहीत. शरद पवार हे पाठिंबा का विरोध हे देखील सांगत नाहीत. त्यामुळे जात बघून मतदान करणार असाल तर तो सर्वात मोठा धोका आहे. मराठ्यांना माझे सांगणे आहे. तत्व पाहिजे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पण भित्र भागूबाई म्हणजे शरद पवार यांच्यासारखे ते नव्हते, अशी टीका त्यांनी यावेळी शरद पवारांवर केली.