गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला झोडपून काढले आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला. पावसाचा फटका कर्नाटक बॉर्डर जवळ असलेल्या लातूर आणि नांदेड या भागाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये कर्नाटक पाटबंधारे विभागाची चूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोवली असल्याचं आता समोर आलं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे लातूरमधील अनेक घरांचे व शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूरही आल्याचं पाहायला मिळालं.
लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी ही 145 किलोमीटर चा प्रवास करते. रेणा, तेरणा यांसारख्या नद्या मांजरा नदीला येऊन मिळतात. जिल्ह्यातील औराद शहाजानीच्या बाजूला तेरणा नदी मांजरा नदीला मिळते, संगम जिथे होतो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असते. मात्र, यावर्षी झालेल्या पावसात त्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मांजरा आणि तेरणाचा संगम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर,मांजरा नदीवर कर्नाटकात कोगळी येथे बॅरेजेस बांधण्यात आले. कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून कर्नाटकात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बॅरेजचे दोनच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे याचा थेट परिणाम मांजरा नदीच्या बॅक वॉटरवर झाला. त्यामुळे, औराद शहाजानी शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. ज्यामुळे शेतकऱ्यांना मूग, उडीद, सोयाबीन सारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अंदाजानुसार साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे, बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून औराद शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठ नुकसान झालं आहे. कर्नाटकातील पाटबंधारे विभागाने योग्य वेळी बॅरजेचे दरवाजे उघडले नसल्यामुळे बॅक वॉटरचे पाणी शेतात आले. त्यामुळे शेकऱ्यांकडून मोठा संताप व्यक्त होतोय.