महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक ही अगदी दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गेल्या ५ वर्षांत पक्षांतर्गत झालेली बंडखोरी, सत्तापालट, बदलेली राजकीय समीकरणं यामुळे राज्यातील राजकारण संपूर्णतः बदलेलं आपण बघितलं. आता याच बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडी, बंडखोरी, उमेदवारीसाठी रस्सीखेच या सगळ्या गोष्टीं आपल्याला बघायला मिळत आहेत. महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीत देखील रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवारीच्या जागेवरून रस्सीखेच होणार असून बंडखोरी अटळ मानली जात आहे. आता ते तीन मतदारसंघ कोणते आहेत..? आणि या मतदारसंघातील बंडखोरीचा कोणाला फटका बसणार..? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
अमरावती जिल्ह्यात ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या आठ विधानसभा विधानसभा मतदारसंघातल्या तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार राजकारण सुरु आहे. बडनेरा, मोर्शी आणि अचलपूर विधानसभा हे ते तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या म्हणजेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात तीन जागा काँग्रेसला, दोन जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, एक जागा भाजपला, एक जागा अपक्ष आणि एक जागा स्वाभिमानी पक्षाला मिळाली होती. परंतु गेल्या पाच वर्षातील बदलेल्या राजकारणामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती यांना प्रत्येकी दोन जागा तर, भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता बडनेरा, मोर्शी आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत येण्याचं कारण काय? इथली सद्यस्थिती काय आहे हे आपण पाहुयात…