मुंबई | माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचे वरळी येथील चार गाळे एसआरएने ताब्यात घेतले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांच्या आरोपांची दखल घेत SRA ने पेडणेकर यांच्यावर कारवाई केली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी किश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील चार सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या अशी तक्रार किरीट सोमय्यांनी केली होती. एसआरएने सोमय्यांची ही तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेत असल्याने आदेश दिले आहेत. पुढील चार दिवसांत मुंबई मनपा अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील असं सोमय्या यांनी सांगितले आहे.
किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) घोटाळा केला. पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे हडपल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, मुंबईच्या दादर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या सगळ्या घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फेत चौकशी व्हावी अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे.