नाशिक | गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवारांविषयी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. ते विधान म्हणजे राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पहायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली. यावर शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे.
कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
दरम्यान, काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे. कार्यकर्त्यांनो कामाला लागा असे जाहीर विधान केले होते. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतर आमदारांची आणि कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा असल्यानं लंकेंच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.