पिकांना बसणार फटका
मुंबई | दिवसेंदिवस राज्यातील वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी थंडी तर कधी उन्हाची झळ सोसावी लागत आहे. त्यातच येत्या १२,१३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेती पिकांवर देखील होत आहे.
जळगाव, औरंगाबाद, जालना आणि नाशिकमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हुडहुडी भरणार असून शेकोट्या पेटणार आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
मागील काही दिवसात राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. आता पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकरी वर्गाच्या सर्व आशा रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही भागात बदलत्या हवामानाचा केळी पिकावर देखील परिणाम झाला आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.