बोगस मतदान करण्याचा मविआचा प्रयत्न
पुणे | कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळाली. काल ५ वाजल्यानंतर आचारसहिंता लागू झाल्यामुळे दोन्ही पक्षाकडून प्रचार देखील थांबवण्यात आला. मात्र प्रचार थांबला तरी राजकीय वार थांबले नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पोलिसांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला म्हणून ते आज कसबा गणपतीसमोर आमरण उपोषणाला देखील बसले होते परंतु त्यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने धंगेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आचारसंहीतेचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
त्यावर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले. मात्र आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. कसब्यात बोगस मतदार आणून बोगस मतदान करण्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
बोगस मतदान करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिथे केली आहे ते सगळे केंद्र आम्ही पोलिसांना सांगितले आहेत असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, प्रचार थांबला असताना देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने उपोषणाचा बनाव केला. याच्या पाठीमागे त्यांनी प्रचार केला. त्यामुळे त्यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्याची मागणी करत यासाठी आम्ही आयोगात तक्रार दाखल करणार आहोत, असे जगदीश मुळीक यांनी म्हटले आहेत.