मुंबई । आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी सीजन मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याला झालेली दुखापत अजूनही गंभीर असल्याची माहिती आहे. याशिवाय, जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पात्रतेच्या अगदी जवळ आहे. परंतू आता अशा अवस्थेत बुमराहला खेळणेही कठीण झाले आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय व्यवस्थापन जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त करण्याच्या विचारात आहे. कारण बुमराह हा भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. भारताला आगामी एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा असेल, तर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघात बुमराहची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची आहे.
दरम्यान, बुमराहने आत्तापर्यंत भारतासाठी 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये जसप्रीतने अनुक्रमे 128, 121 आणि 70 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्सकडून 120 सामन्यांमध्ये 145 विकेट घेतल्या आहेत.