१ ते ३ मार्च रोजी होणार स्पर्धा
पुणे | विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित ‘इनोव्हेशन हॅकेथॉन २०२३’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १ ते ३ मार्च २०२३ दरम्यान या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन क्विक हिल टेक्नॉलॉजीचे सीटीओ संजय काटकर यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे. यामध्ये आयडियाथॉन, फॉर्माथॉन, आंत्रप्रेन्यूअरील, मेड इन एमआयटी डब्ल्यूपीयू आणि वर्क्याथॉन हे पाच गट असतील. विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना साकार करून त्याला मूर्तरुप द्यायची आहे. या पाच गटांसाठी एकूण ४५६ प्रॉब्लेम्स विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ५०० मेंटॉर नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य, बिजनेस अॅण्ड लिडरशीप, आर्टस, ह्यूमॅनिटीस अॅण्ड प्रोफेशनल्स स्टडिज, सस्टेनेबल स्टडिज, सार्वजनिक आरोग्य, कोरोना विषयक औषध निर्माण इ. क्षेत्रातील ३००० स्पर्धक यामध्ये सहभागी झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उद्योजकतेला खतपाणी घालण्यासाठी नवनिर्मिती आणि नवीन संकल्पना आत्मसात करण्याची वेळ आली आहे. या स्पर्धेतून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल असे मत चिटणीस यांनी व्यक्त केले.
माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी या स्पर्धेतून मदत होणार आहे असे प्रा.डॉ. पांडे यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी अनेक कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रोजेक्टला सक्रिय मदत करण्याचे डॉ. डी. पी. अग्रवाल व डॉ. वऱ्हाडे यांनी आश्वासन दिले आहे.
या पत्रकार परिषदेला भारतीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.डी.पी. अग्रवाल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव गणेश पोकळे व डॉ. कृष्णा वऱ्हाडे उपस्थित होते.
दरम्यान, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, सुप्रसिध्द संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ३ मार्चला पारितोषिक वितरण होणार आहे.