पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना, सध्या झालेल्या पदवीधर निवडणुकामध्ये एखादी जागा सोडली तर, जवळपास सगळीकडे भाजपला एकसुद्धा जागा मिळू शकली नाही. देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, असं वक्तव्य केले आहे.
कसबा पोटनिवडणुकीविषयी बोलताना, त्यांनी भाजपवर निशाणा साधत कसब्यात धंगेकरांना दोन ठिकाणी जास्त मतं मिळाली आहे. हा बदल पुण्यात होत आहे. याचाच अर्थ लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी पक्ष आहे. त्यांच्या सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्ष हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँडमध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती घेऊन त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असं म्हणत त्यांनी नागालॅंडच्या जनतेचे आभार मानले आहेत.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर असताना यावेळी शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती मिळाली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे असं देखील पवार म्हटले आहे.