मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील होत असलेला वातावरणातील बदल आपण सर्वानीच पाहिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हवामान बदलाचा आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अचानक जर पाऊस आला तर मात्र, द्राक्ष उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम चालू आहे. त्यामुळे फळघडाचे नुकसान होऊन फंगसचे आक्रमण होण्याची देखील शक्यता आहे. इतर पिकांनाही पावसामुळे नुकसान होऊ शकते.
पाऊस किती होतो, त्यापेक्षा पाऊस कशा पद्धतीचा होतो, यावर शेतीपिकांचे नुकसान अवलंबून आहे. पाऊस जरी २ ते १० मिमी असला तरी त्याचबरोबर वाराही ताशी २० ते २५ किमी वेगाचा असु शकतो. वाऱ्यामुळे फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान होऊ शकते.
दरम्यान, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.