मुंबई | आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह हे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी मुंबईत येणार आहेत. त्याचबरोबर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक देखील होणार आहे. या बैठकीत अमित शहा मिशन 45चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण काय आहे, यासोबतच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची काय स्थिती आहे यावर आजच्या या बैठकीत चर्चा होणार आहे.
उद्या नवी मुंबईतील खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या तयारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाहणी केली. या सोहळ्यासाठी जवळपास १५ ते २० लाख समर्थक येणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्री 12 पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असणार नाही. मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.