पुणे | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींचं कौतुक केलं आहे. भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पसरवला, अशा शब्दांत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अजित पवार यांची ‘दिलखुलास दादा’ ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी आणि भाजपच्या कार्यशैलीसंदर्भात भाष्य केलं आहे.
भाजप 2014 मध्ये पहिल्यांदा बहुमताने निवडून आला. 2014 आणि 2019 मध्ये एकहाती सत्ता घेणारा पक्ष हा भाजपच होता. या काळात नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप सर्वदूर पोहचला. नरेंद्र मोदींचा करिष्मा हा देशात चालला आणि त्यांनी देशातील करोडो जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांची भाषणंदेखील गाजले. त्यांनी जनतेला आपलंसं केलं होतं. त्यानंतर जनतेला वाटलं की आपण नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे सूत्रं द्यावीत आणि जनतेनेही मतांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींकडे देशाचे सूत्रं दिली, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.
त्याचबरोबर त्यांना मोदींनंतर कोण? असं विचारल्यानंतर वेळ येईल तेव्हा नक्की उत्तर देईल, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. अजित पवारांचं हे उत्तर ऐकताच सभागृहात हशा पिकला.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली. सगळ्यांनी देशाचं हित कशात आहे हे बघायला हवं. देशाचं भलं कशात आहे हे पाहिलं पाहिजे आणि भारताला पुढे नेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.