पुणे | जगामध्ये भरड धान्याचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारत हा भरड धान्याचा आगार आहे. आणि नुकत्याच आलेल्या कोरोना महामारीमध्ये जगातील अनेक देशातील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याचे निदर्शनास आले. यापुढे कोरोनासारख्या अनेक साथीच्या आजारांची शृंखलाच येणार आहे. त्या परिस्थितीत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम केवळ भरड धान्य करू शकणार आहे. आणि ही रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता भारतात आहे, असे प्रतिपादन मिलेट वुमन ऑफ इंडिया शर्मिला ओसवाल यांनी केले.
जीतो पुणे लेडीज विंगच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने जीतो पुणेच्या सभागृहात ‘भरड धान्य आणि भारत’ याविषयावर शर्मिला ओसवाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जीतो पुणे लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ लकीशा मर्लेचा, माजी अध्यक्षा खुशाली चोरडिया, उपाध्यक्ष विमल बाफना, सहसचिव नयना खिंवसरा, आरोग्य विभागाच्या संचालिका भावना ओस्तवाल, समन्वयक स्मिता जैन, सहसमन्वयक सारिका मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे चालु वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. जगभरात भरड धान्याचा प्रसार व प्रचार सुरु असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष प्रयत्नानेच भरड धान्याचा जगभर प्रसार होत आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी हे प्रमुख भरड धान्य असून तेच खरे आपले अन्नधान्य आहे. गहू, बासमती तांदूळ हे आपले अन्नधान्य नाही. परंतु, चुकीच्या समजुतीतून आपण आपले स्थानिक अन्नधान्य खाण्याचे टाळत आहोत. त्यामुळे पूर्वीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीची रोग प्रतिकारकशक्ती कमी आहे, असे शर्मिला ओसवाल यांनी सांगितले.
शर्मिला ओसवाल म्हणाल्या की, हल्लीच्या पिढीमध्ये पिझ्झा, बर्गर आणि चायनीज पदार्थांचे खूप आकर्षण आहे. परंतु, या पदार्थात आरोग्यासाठी हानीकारक पदार्थांचा वापर केला जातो. आपण ज्वारी, बाजरी, नाचणीपासून देखील अनेक पदार्थ बनवू शकतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य जपले जाते. भरपूर प्रमाणात जीवनसत्व असलेले आपले स्थानिक अन्नधान्यच आपण खाल्ले पाहिजे. त्यामुळे या उत्पादनांना मागणी वाढेल आणि मागणी वाढली की शेतकरी देखील ते पिकवतील. त्यांना चांगले पैसे मिळतील.
यापुढील लढाया थेट लढल्या जाणार नाहीत. त्या अशाच लढल्या जातील. विविध प्रकारचे विषाणू व जीवाणू येतील. त्यावेळी आपली रोग प्रतिकारशक्तीच आपल्याला व आपल्या कुटुंबाला वाचवू शकेल. दुश्मनांपासून सीमा सुरक्षा जशी महत्वाची आहे तशीच आरोग्य सुरक्षा देखील आता महत्वाची झाली आहे. म्हणून भरड धान्याचा रोजच्या जेवणातील वापर वाढला पाहिजे. पाश्चिमात्य देश आता भरड धान्याची मागणी करीत आहेत. योगा आणि आयुर्वेदाप्रमाणे त्यांना भरड धान्याचे देखील महत्त्व समजले आहे, असेही शर्मिला ओसवाल यांनी यावेळी सांगितले.