सोलापूर | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. राज्यामध्ये सध्या त्यांचे दौरे सुरु आहेत या दरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन नागरिकांशी संवाद देखील करत आहेत.
दोन दिवसांपासून ते सोलापुर दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा निर्धार बोलून दाखवला आहे. आता पुन:श्च हरिओम करायचं आहे. वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. हाच निर्धार मी मनाशी पक्का केला आहे, असं पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे.
त्याचबरोबर राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. त्यांच्यासाठी मला माझा निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलावे लागले त्यात एक गैरसमज होता. मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ संघटनेचं काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क करायचा ठरवलं होतं. पण तो गैरसमज झाला. आज तो दूर झाला याचा आनंद आहे, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस हा साडे तीन जिल्ह्याचा पक्ष आहे. तरीही कर्नाटकात निवडणुका लढत आहे. हे पार्सल फेकून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील जनतेला केलं होत. त्यावर प्रतिउत्तर देताना मी आज निपाणीला चाललो आहे. कोण पार्सल आहे आणि कोण किती वर्षाचा आहे हे सर्व तिथे बोलणार आहे. इथे नाही बोलणार, असं पवार म्हणाले.
दरम्यान, दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र सोडलं यावर उत्तर देताना तो अग्रलेख मी वाचला नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देऊ. आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच मी भाष्य करेल. नाही तर गैरसमज निर्माण होतील. पण शिवसेनेची भूमिका आघाडीच्या ऐक्याला पोषक अशीच असेल, असं सांगतानाच महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित आहे. काही काळजी करू नका, असं पवार म्हणाले. शरद पवार यांनी वारस निर्माण केला नाही या सामनातील विधानावर हे त्यांचं मत आहे, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.