भाजपानं यंदाची लोकसभा निवडणूक जिंकली तर नरेंद्र मोदी फक्त पुढच्या वर्षींपर्यंत पंतप्रधान राहतील. त्यानंतर अमित शाह पंतप्रधान होतील,’ असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत असून त्यांच्याजागी अमित शहा नवे पंतप्रधान बनतील असा दावा करत केजरीवाल यांनी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश अशा उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यांतील मतदारांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.
तिहार तुरुंगातून बाहेर येताच ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात जरबदस्त तलवारबाजी सुरू केली आहे. त्यांच्या प्रत्येक शाब्दिक वारावर भाजपला प्रतिक्रिया द्यावी लागत आहे. २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने राजकीय अजेंडा निश्चित केला होता, त्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना प्रतिक्रिया द्यावी लागत होती. त्यावेळी भाजपने नवनवे मुद्दे मांडून विरोधकांना नाकीनऊ आणले होते. यावेळी विरोधकांच्या मुद्द्यांवर भाजपची फरफट होताना दिसते. काँग्रेसने जातनिहाय जनगणना, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, निवडणूक रोख्यांतील घोटाळा, संविधान बदलाचा धोका असे भाजपसाठी अडचण ठरणारे अनेक मुद्दे अधिक उपस्थित केले आहेत. राहुल गांधींनी मोदींना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यावर, ‘आव्हान देणारे राहुल गांधी कोण’, असा प्रतिप्रश्न करून भाजपच्या स्मृति इराणींना मोदींचा बचाव करावा लागला आहे.
आधी खरगे-राहुल गांधींनी तर आता केजरीवालांनी भाजपविरोधात अजेंडा निश्चित केल्यामुळे खुलासे करता करता भाजपनेत्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. केजरीवालांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना हैदराबादमध्ये तातडीने खंडन करावे लागले. अमित शाह यांनी केजरीवाल यांना उत्तर दिलं आहे. ‘मी अरविंद केजरीवाल आणि कंपनी तसंच इंडिया ब्लॉकला सांगू इच्छितो की भाजपाच्या घटनेत 75 वर्ष वयोमर्यादा अशी कोणतीही तरतूद नाही. पंतप्रधान मोदी फक्त हा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत तर ते भविष्यातही नेतृत्त्व करतील. देशात याबाबत कोणताही संभ्रम नाही,’ असं शाह यांनी स्पष्ट केलं.असं असलं तरी केजरीवालांनी मोदींच्या पंचाहत्तरीचा मुद्दा ऐरणीवर आणून भाजपमधील पक्षांतर्गत स्पर्धेला खतपाणी घातल्याचे मानले जात आहे. त्यातून मोदीविरुद्ध शहा आणि शहा विरुद्ध इतर नेते असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचं बोललं जात आहे.