लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विचारानुसार चालणाऱ्या संघटनांनी, प्रसिद्धी माध्यमांनी भाजपाच्या अतिआत्मविश्वासावर आणि घेतलेल्या काही निर्णयावर उघडपणे टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था मानली जाते. त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेली भाजपाची कानउघडणी गांभिर्यानं घेतली गेली. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मध्ये सुद्धा भाजपाचा लोकसभा निवडणुकीतील पराभव का झाला याची कारणं आणि भाजपाची कामगिरी याच्यावर भाष्य केलं गेलं. विवेक साप्ताहिकात देखील भाजपाला चांगलंच सुनावलं… हे नेमकं का घडलं तेच आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत…
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. भाजपाच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि शिवसेना भाजपासोबत आल्याचं चित्र तयार करण्यात आलं. भाजपाकडून असा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे यांना सहानुभूती निर्माण झाल्याचं दिसलं. शिंदेच्या शिवसेनेसोबत बहुमतात महाराष्ट्रात सरकार सुरु असताना भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंड घडवून आणलं म्हणजे तशीच चर्चा होत असते. आणि इथंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या मूळ लोकांना हा निर्णय आवडला नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीसाठी ही बेरीज केल्याचं सांगण्यात आलं. लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्याविषयी संघ किंवा भाजपाच्या मूळ विचारधारेच्या नेत्यांकडून काहीही टीकाटिप्पणी करण्यात आली नाही. परंतु, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत काहीच फायदा न झाल्याचं निकालात स्पष्ट झालं आणि त्यानंतर संघाने व त्यांच्या विचारधारेतील माध्यमांनी याविषयी स्पष्ट भूमिका घेण्यास सुरुवात केली. अजित पवारांना सोबत घेण्याच्या निर्णयावर तर, थेट प्रहार करण्यात आला. महाराष्ट्रात एकूण ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागा लढवल्या व ७ जागा जिंकल्या. तर, अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा लढवल्या आणि केवळ एका जागेवरच त्यांचा विजय झाला. शिवाय भाजपाला अजित पवारांचा काहीच उपयोग झालेला दिसला नाही असं मत संघातील धुरिणांनी व्यक्त केलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती पटलेली नाही. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आणि तो पूर्वी ३० वर्षे सोबत होता. त्यामुळे शिवसेनेला बरोबर घेतल्याचं स्वागत झालं. आज पक्षात जुन्या कार्यकर्त्याचं स्थान काय आणि बाहेरून पक्षात आलेल्यांचे स्थान काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. विरोधी पक्षनेते भाजपावर पक्षफोडीचे आरोप करतायेत. भाजपामधील कित्येक कार्यकर्ते असे आहेत की जे आपल्या नोकरी व्यवसाय उद्योगात यशस्वी आहेत. त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची गरज नाही. त्यांचे प्रत्येकाचे आपापल्या भागांत एक नेटवर्क आहे. या कार्यकर्त्यांना तुमचे स्थान काय आहे असे विचारण्यात येते तेव्हा आमच्या मताला, म्हणण्याला स्थान नाही, असा अर्थ अभिप्रेत होतो आहे. असं संघाच्या विवेक साप्ताहिकाच्या लेखात म्हटलंय