लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केलीय.आषाढी एकादशीदिवशी पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘माझा लाडका भाऊ योजना’ जाहीर केली आहे.ही योजना काय आहे.या योजनेसाठी अर्ज कुठे करावा? पात्रता आणि निकष काय आहेत ? कोणाला किती पैसे मिळणार? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. या योजनेसाठी इच्छुक तरुणांना एखादी आस्थापना, उद्योग किंवा महामंडळांमध्ये कार्य प्रशिक्षण देण्यात येईल.हा प्रशिक्षण कालावधी 6 महिने असेल. या प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण तरुणांना 6 हजार, आयटीआय आणि डिप्लोमा धारकांना 8 हजार, तर पदवी व पदविका धारकांना 10 हजार रुपये दरमहा देण्यात येतील.आता जाणून घेऊयात अर्जदारासाठी पात्रतेचे निकष काय असतील तर…योजनेच्या शासन निर्णयात इच्छुक उमेदवार आणि उद्योगांसाठी पात्रतेचे निकष नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पहिला निकष आहे तो म्हणजे उमेदवाराचं किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावं. दुसरा निकष उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. तिसरा निकष उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. चौथा निकष उमेदवाराची आधार नोंदणी असावी. पाचवा निकष उमेदवाराचं बँक खातं आधारकार्डशी संलग्न असावं. आणि सहावा निकष उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या वेबसाईटवर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.